सहस्र अभंगावली

सहस्र अभंगावली
ज्ञानेश्र्वर महारांजाचे अप्रकाशित अभंग मिळविण्यास ज्या साहित्तिकांचे व ग्रंथकारांचे लिखाणांमुळे सहकार्य झाले त्या सर्वांचे शतश आभार.

Sunday, 12 April 2015

      प्रकरण - 3
गुरू शिष्य संवाद
अर्थात श्रनिवृत्ति-ज्ञानदेव संवाद
संसार साते आलो मी पाहुणा।दिस दोन्ही आनंदा पाहावयासी।।1।।तंव त्याचेनि तेजें झडपिलें मज।मजमाजीं काज होऊनि ठेलें।।2।।चित्त जंव निवडी तंव आपणहि पळे।अवचिता जवळी येतु असे।।3।। जाऊ पाहे परता तव नेतु असे पंथा।वैकुंठींच्या कथा आपण सांगे।।4।। एकरूप दिसे तव सभोंवता आपण।अवघा नारायण ज्ञानदेवा।।5।।

Thursday, 9 April 2015

प्रकरण – २ श्री गुरूगौरव

प्रकरण – २
श्री गुरूगौरव

(८)
प्रथम नमूं तो गुरूदेवो ।जेथे निमालें भवाभावो ।अनादि स्वरूप स्वयमेवो ।तो आदिदेवो नमियेला ।।१।। जें हें मनाचें पै मूळ।जेथे द्वैताचा दुष्काळ ।स्वरूपीं स्वरूप केवळ ।तो अढळ नमियेला।।२।। हें जग जेणेंसि संचले।परी कोठेंही नाही नाडले Iजेवीं हालिया अंतराळें ।तैंसा सर्व मेळे असतांही।।३।। ऐसा सर्वां अतीत ।परी ऐसा जगभरीत ।कनक कांकणी रहात ।तैसा अधिक्रुत निरंतर।४।। जो मनबुध्दिसी अगोचर । तोचि झाला चराचर ।हा आत्मसुखाचा विचार ।अपविस्तार केला जेणे।।५।। तो जाणावा ज्ञप्तिरूप। निव्रुत्तिनाथांचे स्वरूप ।एकदंत नामे ज्ञानदीप । बोधस्वरूप ज्ञानदेवा ।।६।।
(९)
गुरू हा संतकुळींचा राजा ।गुरू हा प्राणविसांवा माझा ।गुरूवीणदेव दुजा ।पाहतां नाहीं त्रिलोकीं ।।१।।गुरूहा सुखाचा सागरू ।गुरू हा प्रेमाचा आगरू ।गुरू हा धैर्याचा डोंगरू ।कदाकाळीं डळमळींना ।।२।। गुरू वैराग्याचें मूळ ।गुरू हा परब्रह्म केवळ ।गुरू सोडवी तात्काळ ।गांठ लिंगदेहाची ।।।३।। गरू हा साधकाशी साह्य ।गुरू हा भक्तालागीं माय । गुरू हा कामधेनु गाय।भक्तांवरीं दुभतसे ।।४।। गुरू घाली ज्ञानांजन ।गुरू दाखवी निजधन ।गुरू सौभाग्य देऊन ।साधुबोध नांदवी।।५।। गुरू मुक्तींचें मंडन ।गुरू दुष्टांचें दंडन। गुरू पापांचें खंडन ।ना ना परी वारितसे ।।६।। काया काशीं गुरू उपदेशी ।तारक मंत्र दिला आम्हांशी ।बापरखुमादेविवराशी । ध्यान मानसीं लागलें ।।७।।

(१०)
गुरूज्ञान नाहीं ज्यासी ।तरूणोपाय नाहीं नाहीं त्याशी ।तो नावडे ऋषीकेशी ।व्यर्थ जन्मासी तो आला ।।१।।देव धर्म नेणे कांहीं । धरी प्रपंचाची सोई । त्या कोठेंही थार नाहीं ।हे वेद बोलिलासे।।२।।कृष्णकथा जो नायके ।राम नाम न म्हणे मुखें ।तया सोस कोटी दुःखें ।जन्म योनी भोगु लागेल।।३।।ज्ञानदेवीं अभ्यास केला ।सर्व संसार हा तारिला। रामकृष्णें भवपाश तोडिला ।सर्व पितरांसहित ।।४।।

(११)
नित्य धर्म नामपाट ।तेंचि वैकुंटींची वाट ।गुरूभजनीं जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ।।१।।धन्य घन्य त्याचा वंश ।घन्य तो आला जन्मास ।तयाजवळी ह्रषीकेश ।सर्वकाळ नांदतु असे ।।२।।रामकृष्णस्मरण जप ।तेंची तयाचें अमूप तप ।तो वास करील कोटी कल्प । वैकुंठपीठ नगरीशी ।।३।। ज्ञानदेवीं जप केला ।हरि समाधीसी साधिला ।हरिमंत्रें प्रोक्षिला ।सर्व संसार निर्घारें।।४।।
(१२)
आदिनाथें बीज सांगितलें कानी ।सोहं हे शिराणी कैवल्यची।।१।। मच्छेंद्र,गोरक्ष पावले या सुखा ।उजळिल्या आशंका ज्ञानाचिया।।२।। निवृत्तिनें गूज स्वतंत्र ओतिलें ।अपार पावले सिध्दपंथें ।।३।। सोहं या मंत्राचा वेदाचा गव्हर । म्हणे ज्ञानेश्र्वर राजयोगी ।।४।।
(१३)
चित्रीं सूर्यबिंब काढूं येईल चांग । प्रकाशाचें अंग काढितां नयें ।।१।। संन्यासाचें सोंग आणूं येइल सांग । अनुभवाचें अंग दावितां नयें।।२।। ब्रह्मज्ञान मुखें बोलूं येइल सांग । वैराग्याचें अंग आणितां नयें ।।३।। ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा सांग । तरिच हें भाग्य येइल हातां ।।४।।
******************************************************


Tuesday, 7 April 2015

प्रकरण – १ अनंत लोचना गजानना । पतित पावना दर्शना

ज्ञानेश्वर महाराज सहस्र अभंगावली


प्रकरण – १

(१)

अनुपम्य मनोहर । कासे शोभे पितांबर ।। चरणी ब्रीदाचा तोडर । देखिला देवी ।।१।। योगियांचा कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।। उभा भिवरेच्या तटीं । देखिला देवो ।।२।। बापरखुमादेवीवरू । पुंडलिका अभयकरू ।। परब्रह्म साहाकरू । देखिला देवो ।।३।।

(२)


सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण ।नाही रूप गुण वर्ण जेथें ।।१।। तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी। पाहते पाहणे दुरी सारोनियां।।२।। ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती। ते हे उभी मूर्ती विटेवरी ।।३।।
**************************************
गणेश वंदन

(३)
दोही देहाचे चर्म श्रवण । भक्ति उपदेश दोन श्रवण । पाँचवां अगम्य श्रवण । तो गजानन आता पूजूं ।।१।। ध्यान मनन दोन्ही करा । देता बोधिता चतुष्टवरा । मंगलदायक वटेश्र्वरा । पूजूं आतां ।।२।। भजन दोंदिल विद्याधरा । सकळशुंङासंवरूपाकरा । चिदानंद दिगंबरा । पूजूं आता ।।३।। मुकुट माथां निव्रूत्तिसार । विद्या आभ्यासितां ज्ञानेश्र्वर । सकळ अभ्यासाचा नरकुंजर । पूजूं आता ।।४।। पुण्यपावन दोन्ही चरण । वैराग्य अनुष्ठान सव्य साधन अनेक भूषणें गजानन । सार निधान पूजूं आता ।।५।।
  
(४)
सरस्वतिचा गणाधीशा। महामतीचा पूर्ण प्रकाशा। रिध्दिसिध्दिचा जगदिशा। पूजूं आता।।१।। नागेश वेढा चक्राकार। श्रुतिगुजाचा महेश्र्वर। निव्रुत्ति पूजूं आता।।२।।  क्रुतांत दंता काळेश्र्वरा। नीळ निव्रुत्ति ज्ञानेश्र्वरा। सिध्दिविनायका आदि ईश्र्वरा। पूजूं आता।।३।।

(५)

मुक्तमाळा भव्यभूषणा।श्रुति नेति गजानना।तुझिया अंगीच्या ना ना भूषणा।कोण वर्णी।।१।।प्रेमळपुष्पें दुर्वांकुरना।आभासनयना अगम्य दर्शना।मुंगिमात्राचियाप्राणा।फरशधरा।।२।।सद्गुरू बोध प्रांजळा।मोदक बोध क्रुपाळा।गौरीनंदना घननीळा।मेघशामा।।३।।निव्रुत्तिगुह्याचिया महामंत्रा।ज्ञानेश्र्वराचा करूणाकरा।तुझिया अगोचर उपचारा।काय वर्णू।।४।।

(६)
अविनाशा अक्षयीं विधि । प्रेमळाच्या साधक सिध्दि। तुझे जाणतेपण वेदीं । नेेणविजे ।।१।। तूं श्रेष्ठांचे मंगलघाम । तुझियाने पठण पुराण । तुझे नाम आम्हां पावन । तिन्ही लोकीं ।।२।। तुझियानें भक्ति मुक्ति । तुझियाने चाले स्फूर्ति । तुझे नाम त्रिजगती पावन आम्हां ।।३।। तुझियाने आम्हां संसार । तुझियाने तारक विचार । तुझियाने हा संसार ।  सार झाला ।।४।। गुरूकुळस्वामिया गणपति । ज्ञानेश्र्वराची मंगळमूर्ति । तुझिया क्रुपेने तटस्थ पावति समाधान ।।५।।



(७)

अविट अमला नभभूषणा । अनंत लोचना गजानना । पतित पावना दर्शना। योग्य तुझिया।।१।।तोडर घंटा विविध विमळा । समाधि समाधानाच्या स्थळा । निर्विंकार निर्गुण  निर्मळा। सार तूंचि ।।२।। द्याळ अनाथनाथा । जंगम स्थावर गुह्य धूपा । पूर्ण व्यापक प्रकाशदीपा ब्रह्मा तूंचि ।।३।। निव्रुत्तिगमनाच्या सिध्दिपंथा । ज्ञानेश्र्वराची उन्मनी अवस्था । तुझिया स्वरूपाची कुसुमकांंता । झळको लागे ।।४।।
********************************************************